राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन काँग्रेस मुख्यालयासमोरच; गोव्यात काँग्रेसची कमकुवतता स्पष्ट
पणजी : पणजी येथील काँग्रेसच्या मुख्यालयासमोर नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. या वेळी त्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा पेटवत काँग्रेसविरोधी घोषणा दिल्या. विशेष म्हणजे, हा प्रकार काँग्रेसच्या कार्यालयासमोरच घडल्यामुळे गोव्यात काँग्रेस पक्ष किती कमजोर झाला आहे, हे जनतेसमोर स्पष्ट झाले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व श्री. सिद्धार्थ कुंकळीकर, श्री. सरवनंद भगत, श्री. दयानंद करबोटकर, श्री. सिद्धेश नाईक, श्री. गिरिराज पै वर्नेकर आणि श्री. समीर मांद्रेकर यांनी केले. माध्यमांशी बोलताना भाजप नेत्यांनी सांगितले की, “जर नॅशनल हेराल्ड प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर काँग्रेसने आंदोलन करण्याचे कारणच काय? त्यामुळे आम्ही त्यांच्या आंदोलनाविरोधात प्रतिआंदोलन केले आहे.”
“गांधी घराणे हे लुटारू घराणे असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच, “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही,” हे अधोरेखित करत काँग्रेसच्या नेतृत्वाने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली.
भ्रष्टाचाराविरोधात तपास यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली. भाजपने गोमंतकीय जनतेला भ्रष्टाचाराविरोधात सजग राहून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी आमच्या बातम्या पाहत राहा.










