नेहरूंनी आंबेडकरांबाबत नेहमीच नीच राजकारण केले : सिद्धार्थ कूकळीकर
उत्तर गोवा भाजपा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान अंतर्गत कार्यक्रम
पणजी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानाच्या निमित्ताने उत्तर गोवा भारतीय जनता पार्टी कार्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार अमर साबळे, मापसा आमदार जोशुआ डिसोझा, पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर, गिरीश वेर्णेकर आदी मान्यवर आणि भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार सिद्धार्थ कूकळीकर यांनी काँग्रेस पक्षावर आणि पंडित नेहरूंवर जोरदार टीका केली. “काँग्रेस सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच अपमान केला. त्यांना संसदेत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले गेले. 1952 च्या लोकसभा निवडणुकीत पंडित नेहरूंनीच आंबेडकरांचा पराभव घडवून आणला. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव १४ हजार मतांनी झाला, पण तब्बल ७४ हजार मते बाद झाली होती. निवडणुकीतील हा प्रकार म्हणजे राजकारण किती नीच स्तरावर जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, “आंबेडकरांनी संविधानात जो भारताचा स्वप्नरूपी आराखडा मांडला होता, तो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्षात आणत आहेत. धारा ३७० चा रद्दबातल, ट्रिपल तलाक कायदा, समान नागरी कायदा यासारख्या निर्णयांनी मोदींनी आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची दिशा दिली आहे.”
माजी खासदार अमर साबळे यांनी काँग्रेस आणि नेहरू यांच्या आंबेडकरांविषयीच्या वागणुकीवर प्रकाश टाकला. “नेहरू आंबेडकरांचा द्वेष करत होते, याची अनेक उदाहरणे इतिहासात उपलब्ध आहेत. आज तीच काँग्रेस ‘जय भीम, जय संविधान’ची घोषणा देत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. जनतेसमोर आता काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असून, दलित समाज लवकरच काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा गौरव करत सर्व उपस्थितांनी भारताचे भवितव्य आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.










