निष्ठावंत आमदाराच्या प्रेमा खातिर ‘मास्क’ मधून प्रकटले मुख्यमंत्री”
मुरगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २४ एप्रिल रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी एक संदेश प्रसिद्ध करत कार्यकर्ते व जनतेला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपलब्ध राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र मुरगावचे आमदार श्री. संकल्प आमोणकर यांनी या दिवशीही आपल्या निष्ठेचे दर्शन घडवत सडा येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रत्यक्ष मुख्यमंत्री उपस्थित नसतानाही, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचा मुखवटा एका कार्यकर्त्याला घालून त्याच्याकडून केक कापण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व जनसेवेचे बळ मिळो, अशा शुभेच्छा दिल्या.
या आगळ्या कार्यक्रमातून आमदार संकल्प आमोणकर यांची मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाबद्दलची निष्ठा व समर्पण प्रकर्षाने दिसून आले. मुरगावच्या विकासात मुख्यमंत्र्यांचे योगदान आणि त्यांचे नेतृत्व याबद्दल आमदार आमोणकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाला भावली.
या कार्यक्रमाला गोवा राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य श्री. प्रसाद प्रभूगावकर, भाजप प्रभारी श्री. संतोष केरकर, मुरगाव मंडळ सचिव श्री. दीपक म्हाळसेकर व श्री. जगदीश गवंडे, एम.एम.सी. नगरसेविका सौ. श्रद्धा आमोणकर तसेच अनेक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील विकास अधिक वेगाने व यशस्वीरीत्या पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.










