शिरगाव लईराई जत्रेत भीषण चेंगराचेंगरी : ६ भाविकांचा मृत्यू, ५० पेक्षा अधिक जखमी; प्रशासनाच्या ढिसाळपणावर संताप
शिरगाव (प्रतिनिधी) – शिरगाव येथील देवी लईराईच्या वार्षिक जत्रोत्सवात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पन्नासाहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला, एक अल्पवयीन मुलगा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेने संपूर्ण गोवा हादरले असून, लईराई उत्सवाच्या इतिहासातील ही सर्वात भीषण दुर्घटना मानली जात आहे.
गर्दीचा ताण अन् व्यवस्थेचा फज्जा लईराई जत्रेसाठी हजारो भक्त शिरगावात जमले होते. पहाटेच्या सुमारास धोंड चढवण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकाचवेळी पुढे धावू लागले, तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. व्यवस्थापनाकडून कोणतीही स्पष्ट सूचना अथवा नियंत्रण नसल्यामुळे अनेक भाविक चेंगरले गेले. त्यात अनेक महिला, वृद्ध आणि तरुणांचा समावेश आहे. विशेषतः धोंड म्हणून सहभागी झालेल्या भक्तांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.
ओळख पटलेली नावे मृतांमध्ये थिवी येथील आदित्य कवठणकर (१५, अवचीतवाडो), तनुजा कवठणकर (५०), यशवंत केरकर (४०, माडेल, थिवी) यांचा समावेश आहे. उर्वरित मृतांची ओळख अद्याप पटविण्याचे काम सुरू आहे.
रुग्णालयात उपचार सुरू जखमी भाविकांना डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण ही दुर्घटना झाल्यानंतर स्थानिक भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “दरवर्षी ही गर्दी ठरलेली असताना, प्रशासनाकडून योग्य नियोजन का करण्यात आले नाही?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा, मार्गदर्शनाचा अभाव आणि गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी फोर्सची अनुपस्थिती यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे अनेकांनी सांगितले.
मंत्री, आमदारांची रुग्णालयाला भेट घटनेची माहिती मिळताच गोव्याचे पंचायती मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट तसेच जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी म्हापसा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व नातेवाइकांना धीर दिला.
तत्काळ चौकशीचे आदेश या दुर्घटनेमुळे गोवा सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र प्रशासनातील निष्काळजीपणा आणि नियोजनशून्यता पुन्हा एकदा लोकांसमोर उघड झाली आहे.
शोकाकुल वातावरण शिरगावसह संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली असून, हा उत्सव आता शोकदायक आठवण बनून राहिला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर शोकसागर कोसळला असून, राज्य सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा करण्याची मागणी होत आहे.










