शिरगाव लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी : मृतांच्या कुटुंबांना १० लाखांची तर जखमींना १ लाखांची मदत, चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
शिरगाव : शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवात पहाटे झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून ७० पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास, ‘होमकुंड’ दर्शनासाठी झालेली गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरी झाली. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच, लईराई जत्रोत्सवातील ही दुर्घटना गांभीर्याने घेत, महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत वाहतूक संचालक वर्षा वर्मा, परिमल अभिषेक आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांचा समावेश आहे.
आरोग्य व्यवस्था सक्रिय
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, “सर्व जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. गरज पडल्यास बाहेरूनही तज्ज्ञ डॉक्टर मागवले जातील. उपचारात कोणतीही हयगय केली जाणार नाही.”
प्रशासनावर कारवाई – वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांची बदली करण्यात आली आहे. म्हापशाचे पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्याकडे डिचोलीचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. विजय राणे यांची डिचोली पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी राहूल गुप्ता यांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
विरोधी पक्षांचा सरकारवर निशाणा
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मृतांच्या कुटुंबांना देण्यात आलेली १० लाखांची मदत ही अपुरी असल्याचे सांगितले. “घटनेच्या गंभीरतेनुसार अधिक भरपाई द्यावी, आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसह निलंबन करावे,” अशी त्यांची मागणी आहे.
भाविक व स्थानिकांचा संताप
घटनेनंतर स्थानिक भाविक व ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. “प्रत्येक वर्षी गर्दी वाढते, पण प्रशासन पुरेशी व्यवस्था करत नाही,” असा आरोप काही स्थानिकांनी केला. अनेकांनी यापुढे अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी गर्दीनियंत्रण, वैद्यकीय सुविधा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात करण्याची मागणी केली.
सरकारच्या पुढील योजना
मुख्यमंत्री सावंत यांनी लवकरच एक सर्वसमावेशक नवा नियमावली (SOP) जाहीर करणार असल्याचे सांगितले, ज्याद्वारे भविष्यात धार्मिक गर्दीत अशा दुर्घटना टाळता येतील.










