आग लागली की आग लावली नागरिकांचा सवाल
मांद्रे आस्कावाडा नाईक वाडा डोंगराळ परिसरात भीषण आग; काजू बागायतींसह २० लाखांहून अधिक नुकसान
मांद्रे: मांद्रे पंचायत क्षेत्रातील आस्कावाडा नाईक वाडा डोंगर माळरानावर लागलेल्या आगीने परिसरात मोठे नुकसान केले असून, या आगीत काजू बागायतींसह विविध प्रकारची झाडे जळून खाक झाली आहेत. या आगीत सुमारे २० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
ही आग ४ तारखेला दुपारी लागली असून, ती पुढे साळगावकर वाडा व नाईक वाडा परिसरापर्यंत पसरली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचू शकावे असा मार्गच खुला नव्हता, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
अलीकडच्या काळात डोंगर व माळरान भागांत आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या भागातील बऱ्याच जमिनी बिगर-गोमंतकीय, विशेषतः दिल्लीतील लोकांनी विकत घेतल्या आहेत. काही वेळा साफसफाईच्या नावाखाली किंवा मुद्दामून आग लावून काजू बागायती व झाडांचे नुकसान करून त्या जमिनी शेतीव्यतिरिक्त इतर वापरासाठी तयार केल्या जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या आगीत काही खाजगी काजूंची झाडे, तसेच सागवानी लाकूडही जळून गेले आहे. आग विझवण्यासाठी अजूनही स्थानिक ग्रामस्थ व जवान प्रयत्नशील आहेत.










