म्हापसा नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत विकास कामांना मंजुरी; पण कुत्रा, कर रूपाने बैठकीत घुसला

👇Click and Listen

म्हापसा नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत विकास कामांना मंजुरी; पण कुत्रा, कर रूपाने बैठकीत घुसला

म्हापसा (प्रतिनिधी) – म्हापसा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक ७ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत विविध विकासकामांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असले तरी, प्रारंभीच वादग्रस्त चर्चा घडून आली. नगरसेवकांनी प्रशासनाच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत जनहिताचे मुद्दे ठामपणे मांडले.

प्रारंभीच वादंग; करप्रणाली आणि भरती प्रक्रियेवर सवाल

बैठकीच्या सुरुवातीसच नगरसेवक डॉ. तारक आरोलकर यांनी अनेक मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, पालिकेकडून आकारला जाणारा घनकचरा कर पूर्णपणे अन्यायकारक पद्धतीने घेतला जात आहे आणि यावर पालिकेने तातडीने पुनर्विचार करावा. तसेच, पूर्वीच्या नोकर भरतीत पारदर्शकतेचा अभाव होता आणि दुकानांना परवाने वाटप करताना नियम पाळले गेले नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

त्याचबरोबर, पालिकेने ‘कुत्रा कर’ (Dog Tax) लागू करण्याच्या प्रस्तावावर कडाडून विरोध करत, सामान्य नागरिकांवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकला जात असल्याचे सांगितले. पालिकेचा निधी हा जनतेची ठेव आहे आणि त्याचा वापर केवळ जनतेच्या सुविधा वाढवण्यासाठीच व्हायला हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

नगरसेवक शशांक नार्वेकर यांनीही कुत्रा करासंबंधी प्रश्न उपस्थित करत विचारले की, “कर वसूल करून तुम्ही कुत्र्यांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा देणार आहात?” जर नागरिकांकडून कर वसूल करून त्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसतील, तर कर आकारण्याचा अर्थ काय?, असा सवाल त्यांनी केला.

बैठकीत खालील प्रस्तावांवर चर्चा व निर्णय

क) पूर्वीच्या बैठकींचे इतिवृत्त निश्चिती

दिनांक ३०/१०/२०२४, ११/१२/२०२४, २८/०२/२०२५, ०७/०३/२०२५, १९/०३/२०२५ आणि ०९/०४/२०२५ रोजी झालेल्या बैठकींचे इतिवृत्त एकमताने निश्चित करण्यात आले.

ख) प्रस्तावांवर मंजुरी

१. घनकचरा व्यवस्थापनासाठी ₹४५.६६ लाख मंजूर

१४व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर निधीतून घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी ही रक्कम वापरण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.

२. JCB खरेदीसाठी ₹३४.९० लाख मंजूर

१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून GEM पोर्टलद्वारे JCB खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

३. विश्वकर्मा योजनेसाठी जागा भाड्याने देण्यास मंजुरी

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी श्रीमती नयनाबेन खोदा यांना ‘अरम सोडा’च्या वरच्या मजल्यावर दरमहा ₹३०,०००/- भाड्याने चार महिन्यांसाठी जागा देण्यास मान्यता देण्यात आली.

४. डिजिटल ग्रंथालयासाठी NOC मंजूर

नगरपालिका क्षेत्रात डिजिटल ग्रंथालय स्थापन किंवा सुधारण्यासाठी अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

५. कुत्रा कर अंमलबजावणीबाबत माहिती

प्रस्तावानुसार, कुत्रा नोंदणीसाठी ₹५०० शुल्क, रेबीज प्रमाणपत्र अनिवार्य आणि वार्षिक नूतनीकरणासाठी ₹१०० शुल्क आकारण्यात येणार आहे.

६. कंत्राटी सेवकांना मुदतवाढ

श्री. प्रज्वल धारगळकर (MI) आणि श्री. मान्थन कासकर (JE) यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.

७. गटार पुनर्बांधणीसाठी ₹१०.४३ लाख मंजूर

वॉर्ड क्रमांक २० मध्ये ‘रफिक नारंगी हाऊस ते मुस्लिम वाडा’ दरम्यान झालेल्या सांडपाणी गटाराच्या कामासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली.

८. सेप्टिक टँक व सोक पिटसाठी ₹१४.०१ लाख मंजूर

म्हापसा टॅक्सी स्टँडजवळील नगरपालिका इमारतीच्या सेप्टिक टँक व सोक पिट बांधकामासाठी खर्च झालेल्या रकमेची मंजुरी देण्यात आली.

९. पे पार्किंग क्षेत्रासाठी ₹१ कोटी मंजूर

म्हापसा मार्केट परिसरातील पे पार्किंग क्षेत्राचे सुधार व उन्नतीकरण करण्यासाठी ₹१ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.

या बैठकीत महत्त्वाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी करप्रणाली, परवान्यांचे वाटप आणि जनतेच्या निधीच्या वापराबाबत नगरसेवकांनी प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.

(संपादनासाठी – Goa TV 24 प्रतिनिधी)

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment