तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक बैठक : मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग : तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाहीचे निर्देश प्रशासनाला दिले.
शिरंगे गावच्या बुडीत भागातील झाडे व बांधकामांचे फेरमूल्यांकन करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी संयुक्त मोजणी व मूल्यांकनाचा फेर आढावा घेऊन अधिसूचनेपूर्वीच्या मालमत्तेचा प्रस्ताव शासनाकडे फेर सादर करण्याचे आदेश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत मंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनाची सकारात्मक भूमिका असून लवकरच योग्य निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, कार्यकारी अभियंता वि.बा. जाधव, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तसेच भूमिअभिलेख, वन आणि कृषि विभागाचे अधिकारी तसेच शिरंगे गावचे अंकुश गवस आणि इतर प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी मंत्री राणे यांचा पुढाकार आणि प्रशासनाची तत्परता यामुळे तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










