पावसामुळे करसवाडा जलमय; नागरिकांचा बोटीतून प्रवास, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
म्हापसा : म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक तीन करसवाडा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी, नागरिकांना अक्षरशः बोटीतून प्रवास करावा लागला, असे चित्र गोवा टीव्ही 24 न्यूजला प्राप्त झालेल्या काही छायाचित्रांमधून दिसून आले.
या भागातील एका नागरिकाने संपर्क साधून सद्यस्थितीचे फोटो पाठवले आणि माहिती दिली की, “हा फक्त उन्हाळ्यातील पाऊस असूनदेखील अशी स्थिती आहे. येत्या जून महिन्यानंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्यात आमची काय अवस्था होईल, याची कल्पनाच करवत नाही. त्यामुळे म्हापसा नगरपालिकेने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.”
या नागरिकाने पुढे सांगितले की, “हा विषय केवळ नागरिकांपर्यंत नव्हे तर म्हापसा नगरपालिकेपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून वेळेत कार्यवाही होऊन येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या अडचणी दूर होतील.”
गोवा टीव्ही 24 न्यूजच्या माध्यमातून आम्ही म्हापसा नगरपालिकेला जनतेच्या वतीने विनंती करतो की, या समस्येची गंभीर दखल घ्यावी व तत्काळ योग्य ती उपाययोजना करावी. नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाची असून, प्रशासनाने सजगपणे काम करत या समस्येचे त्वरित समाधान शोधावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.










