“पणतु कधीच पंतप्रधान होणार नाही, हे लिहून ठेवा” : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
आलदोना: १७ मे, शनिवारी रोजी,खोर्जूवे येथे आलदोना मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार ग्लेन टिकलो, आलदोना मंडळ अध्यक्ष रणजीत उजगावकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. या मेळाव्याद्वारे आलदोना मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा मेळावा आयोजित केला होता.
ग्लेन टिकलो यांचा आमदारावर हल्लाबोल
आपल्या भाषणात माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी सध्याच्या आमदारावर टीका केली. “जे कामे दुसऱ्यांनी केलेली आहेत, ती स्वतःची असल्याचे खोटे दावे आमदार करत आहेत. जनतेच्या कामाकडे होणारे दुर्लक्ष, त्यामुळे मतदार आता पश्चात्ताप करत आहेत. आपण या आमदाराला निवडून देऊन चूक केली. आता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा भाजपाचं कमळ मतदारसंघात फुलवायचं आहे,” असे त्यांनी सांगितले.
दामू नाईक : ‘अंत्योदय’ तत्वावर चालणारं सरकार
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, “भाजपाचं सरकार हे ‘अंत्योदय’ तत्वावर काम करतं – म्हणजेच समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचे काम व सामान्य जनतेचे कल्याण. इतर कुठल्याही सरकारने असे काम केले नाही, जे भाजपा सरकार सातत्याने करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या योजनांचा प्रचार करून त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवावा.”असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे जळजळीत विधान
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस व परिवारवादी पक्षांवर निशाणा साधत जोरदार विधान केलं. “मोदी सरकार हे सामान्य जनतेचं सरकार आहे. यात कुठलाही घराणेशाही नाही. ही घराणेशाही मोदींनी मोडून काढली आहे. आता या घराणेशाहीतील लोकांना घरात बसवण्याची वेळ आली आहे. त्यांचा ‘पणतु’ (वारसदार) कधीच पंतप्रधान होणार नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, “लोकांना आता विकास हवा आहे, घराणेशाही नव्हे. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत भाजपाचं सरकार गोव्यात पुन्हा सत्तेवर येणार याची मला खात्री आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करावी.”
कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी उर्जित करणारे मार्गदर्शन देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी एकमताने विश्वास व्यक्त केला की, आलदोना मतदारसंघात भाजपाचं कमळ पुन्हा फुलणार आहे.










