लष्कर-ए-तैयबा चा कमांडर सैफुल्लाह पाकिस्तानमधील सिंधमध्ये ठार

👇Click and Listen

लष्कर-ए-तैयबा चा कमांडर सैफुल्लाह पाकिस्तानमधील सिंधमध्ये ठार

सिंध (पाकिस्तान) : लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार सैफुल्लाह अखेर ठार झाला आहे. रविवारी (ता. १८ मे) पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्यातील माटली तालुक्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली.

सैफुल्लाह उर्फ विनोद कुमार उर्फ मोहम्मद सलीम उर्फ सलीम भाई या दहशतवाद्याची अनेक नावे होती. तो लष्कर-ए-तैयबाचा नेपालमधील संपूर्ण दहशतवादी मॉड्युल हाताळत होता. लष्कर आणि जमात-उद-दावा या संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या दहशतवादी संघटनांसाठी तो भरती आणि आर्थिक मदतीची व्यवस्था करत होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारकडून सैफुल्लाला संरक्षण दिले जात होते. रविवारी दुपारी निजामनी नावाने ओळखला जाणारा सैफुल्ला माटली येथील आपल्या घरातून बाहेर पडला होता. चौकाजवळ पोहोचताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.

दहशतीच्या कृत्यांचा मास्टरमाइंड

सैफुल्ला भारतात झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. यामध्ये रामपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला, नागपूरमधील संघ मुख्यालयावरचा हल्ला आणि बेंगळुरूतील आयआयएससी वरील बॉम्बस्फोटांचा समावेश होता.

नेपाळचा मार्ग आणि दहशतीचा जाळं

सैफुल्लाने नेपाळच्या नगमा बानूशी निकाह केला होता. तो नेपाळमार्गे लष्करच्या दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे काम करत होता. गेल्या पाच वर्षांत त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक दहशतवादी कारवाया झाल्या ज्यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि भारतात लष्करच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली होती.

पाकिस्तानात मिळवलेले सुरक्षित ठिकाण

अलीकडेच सैफुल्लाह खालिदने सिंधमधील बदीन जिल्ह्यात माटलीमध्ये आपले ठिकाण बनवले होते. तिथूनच तो लष्कर व जमात-उद-दावा साठी काम करत होता. त्याचे मुख्य काम भरती, प्रशिक्षण आणि निधी गोळा करणे हे होते.

या दहशतवादी सरगण्याच्या मृत्यूने लष्कर-ए-तैयबाला मोठा धक्का बसला असून, त्याच्या ठिकाणाबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी सतत लक्ष ठेवले होते.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment