वीज खात्याच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी; चंद्रु गांवकर यांचा वीजेच्या शाॅकमुळे मृत्यू

👇Click and Listen

वीज खात्याच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी; चंद्रु गांवकर यांचा वीजेच्या शाॅकमुळे मृत्यू

होंडा (सत्तरी), दि. २० : सत्तरीतील वीज खात्याच्या निष्क्रियतेमुळे आज पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली असून, होंडा येथे वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना शॉक लागून चंद्रु गांवकर (वय ३८, मूळगाव मोर्ले – सत्तरी) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सर्वेश गांवकर किरकोळ जखमी झाले आहेत. घटना आज दुपारी सुमारे साडेबारा वाजता घडली.

मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी होंडा पंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा सकाळपासून बंद करण्यात आला होता. होंडा बसस्थानकासमोरील खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना चंद्रु गांवकर, सर्वेश गांवकर व राजाराम गुरव हे तिघे कर्मचारी खांबावर चढले होते. मात्र, अचानक वीजपुरवठा सुरू झाला आणि चंद्रु गांवकर यांना जोरदार शॉक लागला. ते खांबावरच अडकले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

सर्वेश गांवकर यांनाही विजेचा धक्का बसला, मात्र ते सौम्य जखमी झाले. राजाराम गुरव यांनाही किंचित शॉक बसला पण त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ खाली उतरल्यानं ते बचावले.

हा वीजपुरवठा अचानक सुरू कसा झाला याचे समाधानकारक उत्तर वीज विभागाकडे नाही. सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता कोणताही स्पष्ट खुलासा देण्यास असमर्थ आहेत. “शॉक कसा लागला हे आम्हालाही कळले नाही,” असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असून, वीज खात्याची निष्क्रियता आणि व्यवस्थात्मक त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मित्रानंतर आता स्वतःचा बळी

तीन वर्षांपूर्वी ठाणे-सत्तरी येथील संजय गांवकर यांचाही असाच प्रकार घडून मृत्यू झाला होता. गुळेली-कणकीरे येथे काम करत असताना वीजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे संजय व चंद्रु हे दोघेही एकाच बॅचमधून प्रशिक्षण घेतलेले होते व त्यांची घट्ट मैत्री होती. नियतीने दोघांनाही एकाच प्रकारे हिरावून घेतले.

छायाचित्र:

अपघात घडलेला वीज खांब व मृत चंद्रु गांवकर यांचे छायाचित्र

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment