बहुजनांचा कैवारी विजय सरदेसाई : किरण कांदोळकर
मडगाव : गोव्यातील माजी आमदार किरण कांदोळकर यांनी विजय सरदेसाई यांना “बहुजनांचा कैवारी” म्हणून गौरविले. सरदेसाई यांच्या ५५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कांदोळकर बोलत होते.
किरण कांदोळकर म्हणाले, “गोव्यात जर कोणी बहुजन समाजासाठी खऱ्या अर्थाने झटणारा नेता असेल, तर तो विजय सरदेसाई आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून बहुजन समाजासाठी न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून दिला आहे.”
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते, पण त्यापैकी एका बहुजन आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही. सुदीन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांनी स्वतःकडे मंत्रीपदे ठेवली आणि एका बहुजन आमदाराला डावलले.
“पण याउलट विजय सरदेसाई यांच्यासोबत निवडून आलेले दोन बहुजन आमदार – जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर – यांना त्यांनी मंत्रिपदे दिली. त्यामुळेच हे स्पष्ट होते की विजय सरदेसाई हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे प्रतिनिधी आहेत,” असे कांदोळकर यांनी स्पष्ट केले.
कांदोळकर यांनी यावेळी विजय सरदेसाई यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. “फक्त गप्प बसून चालणार नाही, तुम्ही आता गोव्याच्या राजकारणात बहुजनांचा चेहरा म्हणून पुढे आलाच पाहिजे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही येत्या काळात मुख्यमंत्री नक्कीच व्हाल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वक्तव्यानंतर गोव्यातील बहुजन समाजातील एक नेता ब्राह्मण समाजातील नेत्याला आपला कैवारी मानत असल्याचे उदाहरण समोर आले. त्यामुळे कांदोळकर यांच्या वक्तव्यानुसार, “गोव्यात आता जातीयवाद संपुष्टात येईल आणि हिंदू समाजात एकरूपता निर्माण होईल.”
कांदोळकर यांच्या वक्तव्यावरून असे दिसून येते की, भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याची धुरा सांभाळणारा कोणीतरी, या गोव्यामध्ये आहे आणि तो नेता म्हणजे विजय सरदेसाई आहे. असे त्यांच्या एकूण वक्तव्यावरून स्पष्ट दिसून येत. विजय सरदेसाई हेच पुढे जाऊन बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम करतील असा विश्वास आता बहुजनांच्या मध्ये निर्माण होत आहे. असंच कांदोळकरांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत आहे.
विजय सरदेसाईंकडून तिसऱ्या आघाडीचे संकेत; गोव्यातील काँग्रेसच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह
आमदार विजय सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी तिसऱ्या आघाडीचे स्पष्ट संकेत दिले. येणाऱ्या पुढील वाढदिवसापर्यंत गोव्यातील जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सक्षम पर्याय मिळेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांच्या या विधानामुळे गोव्यात नवीन राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाची अवस्था आणि त्याचे भवितव्य या पार्श्वभूमीवर एक प्रकारची अनिश्चितता दिसून येते. जर तिसरी आघाडी खरोखरच मजबूत झाली, तर गोवा काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील ४० पैकी सुमारे १७ मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू झाल्याचे समजते. याचे स्पष्ट संकेत नुकत्याच पार पडलेल्या विजय सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावरील नेत्यांच्या उपस्थिती. काही ठराविक नेते या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित न राहता, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच व्हाट्सअॅप, फेसबुक किंवा फोनवरूनच शुभेच्छा देताना दिसले. या घडामोडींवरून येणाऱ्या काळात तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेला चालना मिळाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजकीय हालचालींना वेग येत असून, अनेक नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसून येते.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील राजकारणाला नवीन रंगत मिळण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपली रणनीती कोणत्या प्रकारे आखणार, हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल.










