गोवा इंडियात आहे, पण गोव्यात इंडिया गटबंधन आहे का?
गोव्यात इंडिया गटबंधनातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. आज फातोर्डा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे ही बाब अधिक स्पष्ट झाली आहे. सरदेसाई यांनी सूचित केले की, गोव्यात इंडिया गटबंधन कधी अस्तित्वात होतेच असे नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एका पक्षाला वरून तर दुसऱ्याला मागून पाठिंबा देण्यात आला होता. हे वास्तव असून, कोणीही त्यापासून दूर जाऊ शकत नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी अनेक पक्षांचे मतभेद असून, त्यांची भूमिका अनेकांना अडचणीची वाटते आहे. यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावे, अशी अप्रत्यक्ष टीका विजय सरदेसाई यांनी केली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, गोवा फॉरवर्ड पार्टीने काँग्रेससोबत २०२७ पर्यंत युती कायम ठेवली आहे. मात्र काही बाबतींत समन्वयाचा अभाव दिसतो. कुडचडेत एकाच दिवशी काँग्रेस व गोवा फॉरवर्डचे कार्यक्रम ठरल्यावर, सरदेसाई म्हणाले की अमित पाटकरांनी एक फोन केला असता, तर मी माझा कार्यक्रम पुढे ढकलला असता. पण काहींना असुरक्षितता वाटते, त्यावर मी काही बोलू शकत नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसला “दीडशे वर्ष जुना पक्ष” म्हणत त्यांनी नेतेमंडळींवर उपरोधिक टीकाही केली.
दरम्यान, आम आदमी पार्टीनेही काँग्रेसविरोधी भूमिका घेतली असून, त्या दोन्ही पक्षांमध्ये वाढती दरी स्पष्ट होत आहे. त्यामुळे गोव्यात इंडिया गटबंधन फक्त नावापुरते उरले आहे, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय सरदेसाई यांच्याभोवती माजी व विद्यमान अशा अनेक नेत्यांचा मजबूत गट तयार होत आहे. गोव्यातील ४० पैकी जवळपास १४ माजी आमदार आणि दोन विद्यमान आमदार त्यांच्याशी संपर्कात आहेत. अजून अनेक माजी आमदार औपचारिक घोषणा न करता निवडणुकीच्या जवळपास योग्य संधीची वाट पाहत आहेत.
सरदेसाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न अधिक गतीने सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी काळात ते गोव्याच्या राजकारणातील गेम चेंजर ठरू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
ही घडामोड काँग्रेससाठी गंभीर इशारा ठरू शकते. काँग्रेस पक्षाचे गोव्यातील अस्तित्व संकटात येणार का? आणि विजय सरदेसाई काँग्रेसची जागा घेतील का? याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 69796