मसूद पेजेश्कियान यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, कट्टरपंथी जलिली यांचा पराभव, झाली मोठी उलथापालथ.
इराणमध्ये सुधारणावादी सत्तेवर आले आहेत. इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर मुदतपूर्व निवडणुकीत कट्टरपंथींचा पराभव झाला आहे. मसूद पेझेश्कियान हे आता इराणचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील. अनेक दशकांपासून अमेरिकेशी संघर्ष करणाऱ्या या देशाला पाश्चिमात्य देशांशी जोडण्याचे आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिले होते.
निवडणुकीत सुधारणावादी नेते पेझेश्कियान यांना 16.3 दशलक्ष मते मिळाली, तर कट्टर उमेदवार सईद जलिली यांना 13.5 दशलक्ष मते मिळाली. पेझेश्कियान हे व्यवसायाने हृदय शल्यचिकित्सक आहेत आणि दीर्घकाळ खासदार आहेत. देशाच्या सत्तेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मतमोजणी सुरू असतानाच त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केला.










