काणका येथे मेहेंदी कार्यशाळा.

👇Click and Listen

काणका येथे मेहेंदी कार्यशाळा.

बंदिरवाडा, कायसूव-बार्देश येथील रिद्धी कला केंद्राच्या पुढाकाराने वेर्ला-काणका पंचायतसदस्य सागर लिंगूडकर यांच्या काणका येथील निवासस्थानाच्या आवारात महिलांसाठी मेहेंदी कार्यशाळा घेण्यात आली. या दोन दिवसीय मोफत कार्यशाळेत रिद्धी नागवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

वेर्ला-काणकाच्या माजी पंचायतसदस्य संगीता सागर लिंगूडकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे मार्ना-शिवोली येथील समाजसेवक कपिल कोरगावकर, रिद्धी कला केंद्राच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, सागर लिंगूडकर, सेल्फ हेल्प ग्रूप चळवळीतील वरिष्ठ पदाधिकारी कीर्ती नाईक यांची उपस्थिती होती.

पार्वती नागवेकर यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुणे कपिल कोरगावकर या वेळी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, महिलांचा उद्धार करणे व त्यांच्या कलात्मकतेला प्रत्येकाने चालना देणे ही आजच्या काळाची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मी स्वत: पुढाकार घेऊन घर-संसार चालवणाऱ्या गृहिणींचा सत्कार करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्याअंतर्गत शिवोली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रातील साठ महिलांचा सत्कार आगामी वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. आतापर्यंत असे कार्यक्रम सडये-शिवोली व ओशेल शिवोली अशा दोन पंचायत क्षेत्रांत झालेले आहेत. आगामी कार्यक्रम हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रात होणार आहे.

कार्यशाळेच्या अंतर्गत शरीरावर मेहेंदी चितारण्याच्या कलेविषयी प्रशिक्षणार्थींना विस्तृत माहिती देऊन विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच, प्रशिक्षणार्थींकडून सरावही करून घेण्यात आला. कार्यशाळेत सुमारे बावीस प्रशिक्षणार्थींचा पूर्णवेळ सहभाग होता.

कार्यशाळेच्या अखेरीस प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित केलेल्या मेहेंदी चितारण्याच्या स्पर्धेत विजेता ठरलेल्या नफिझा शेख (प्रथम), झाहीन कारोल (द्वितीय) व मधुशी आगरवाडेकर (तृतीय) यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके समारोपावेळी देण्यात आली. प्रारंभी कीर्ती नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सागर लिंगूडकर यांनी आभारप्रकटन केले.

फोटो कॅप्शन :

म्हापसा : काणका येथे झालेल्या मेहेंदी कार्यशाळेचे उद्‍घाटन करताना वेर्ला-काणकाच्या माजी पंचायतसदस्य संगीता लिंगूडकर. बाजूला कपिल कोरगावकर, पार्वती नागवेकर, सागर लिंगूडकर तसेच प्रशिक्षणार्थी.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment