मेहेंदी’ला फार मोठे सांस्कृतिक अधिष्ठान : सुदेश आर्लेकर
सडये-शिवोली येथे दोन दिवसीय कार्यशाळा
म्हापसा दि. ८ (प्रतिनिधी)
आपल्या भारतीय संस्कृतीत शरीरावर मेहंदी चितारण्याच्या कलेला फार मोठे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मुसलमानी आक्रमणांमुळे भारतात सर्व जातिधर्मांत या कलेचा बहुव्यापक प्रसार झाला असून, सर्जनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या या कलेला भारतात अमाप लोकप्रियताही लाभलेली आहे, असे प्रतिपादन ‘कोकण मराठी परिषद, गोवा’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांनी केले. बंदिरवाडा-कायसूव येथील रिद्धी कला केंद्राने मार्ना-शिवोली पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या दोन दिवसीय मेहेंदी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर कार्यशाळेच्या प्रशिक्षक रिद्धी नागवेकर, रिद्धी कला केंद्राच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, कार्यशाळेच्या व्यवस्थापक तथा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा साळगावकर यांची उपस्थिती होती. पार्वती नागवेकर यांनी केंद्रांच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन कार्यशाळा आयोजित करण्याचा हेतू सांगितला. पर्यटन व्यवसाय व शाही विवाह सोहळ्यांचे आयोजन या माध्यमातून या कलेद्वारे गोमंतकीयांना चांगल्यापैकी आर्थिक कमाई होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
कार्यशाळेच्या निमित्ताने प्रशिक्षणार्थींसाठी घेण्यात आलेल्या मेहंदी स्पर्धेत अक्षया आगरवाडेकर, प्रियंका गोंधळी व स्नेहल कळंगूटकर यांना अनुक्रमे पहिली तीन पारितोषिके प्राप्त झाली. समारोपावेळी प्रमुख पाहुणे अक्षता किनळेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी प्रतिभा सडेकर यांनी आभारप्रकटन केले. या कार्यशाळेत परिसरातील विद्यार्थिनी, युवती व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
फोटो कॅप्शन :
मार्ना-शिवोली येथे आयोजित मेहेंदी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करताना सुदेश आर्लेकर. बाजूला प्रिद्धी नागवेकर, पार्वती नागवेकर, प्रज्ञा साळगावकर व प्रतिभा सडेकर.










