मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी चालवली आहे.

👇Click and Listen

मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी चालवली आहे, ती वेळीच न रोखल्यास भविष्यात आपल्याला जीवनासाठी खडतर सामना करावा लागणार आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी केले.

हणजूण कायसूव पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बार्देश तालुक्यातील काही व तिसवाडी तालुक्यातील जैवविविधता समित्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून जैवविविधता समित्यांचे कार्य व जैवविविधतेचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

पर्यावरणीय बदलांचा सजीव प्राण्यांवर विपरीत परिणाम होत आहे. अशावेळी आपण सावधपणे जैवविविधतेचे रक्षण करणे काळाची गरज आहे. या जैवविविधतेचे रक्षण केल्यास आपल्या बरोबरच भावी पिढीचे जीवन देखील सुखकर होईल. प्रत्येक पंचायत क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी जैवविविधता घटकांची नोंदणी करून त्यांचे रक्षण करायला हवे. गावागावातील नैसर्गिक जलस्त्रोत, जंगल संपदा, वनस्पती, प्राणी, पक्षी, जुनाट वृक्ष यांचे रक्षण व जतन व्हायला हवे. जैवविविधता समित्यांना कार्य पुढे नेण्याकरिता गोवा राज्य जैवविविधता मंडळ सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठमोठे प्रकल्प बांधकाम करताना वन खाते तेथील झाडांची कापणी करण्याकरता परवानगी देते, परंतु याची माहिती स्थानिक जैवविविधता समित्यांना नसते. आता यापुढे अशा मोठ्या बांधकाम प्रकल्पातील झाडांची परवानगी देताना वनखाते स्थानिक जैवविविधता समित्यांना कळवणार असल्याचे डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी सांगितले.

शेवटी हणजूण कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.

हणजूण येथे आयोजित करण्यात आलेल्या बार्देश व तिसवाडी तालुक्यातील जैवविविधता व्यवस्थापन समिती बैठकीत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉ. प्रदीप सरमोकादम.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment