जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी एलओसीवर दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी उत्तर काश्मीरच्या उरी सेक्टरमधील गोहलन भागात नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर लष्कराला प्रत्युत्तर द्यावे लागले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, मात्र हा भाग एलओसीच्या जवळ असल्याने त्यांचे मृतदेह तातडीने बाहेर काढता आले नाहीत.
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी रविवारी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे. नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला आव्हान दिले होते आणि त्यांना लक्ष्य करून गोळीबार केला होता. ज्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आज सापडले ते कालच्या कारवाईत ठार झाले.
यापूर्वी, उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये 19 जून रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले. 9 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये वैष्णोदेवीला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. चालकाला गोळी लागल्याने बसचे नियंत्रण सुटून ती खोल खड्ड्यात पडली. या दहशतवादी हल्ल्यात 9 भाविक ठार तर 30 हून अधिक जखमी झाले होते.











