ज्येष्ठ पत्रकार संपादक सागर जावडेकर यांच्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा पेडणे तालुका पत्रकार समितीचा तीव्र निषेध
पेडणे (प्रतिनिधी )
ज्येष्ठ पत्रकार संपादक सागर जावडेकर यांच्यावर गुरुवारी चिंबल जंक्शन रायबंदर येथे काही अज्ञात व्यक्तीने केलेल्या भ्याड हल्ल्याचा पेडणे तालुका पत्रकार समितीने तीव्र निषेध केला आहे.
पेडणे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष पत्रकार प्रकाश तळवणेकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या पत्रकारावर असा भ्याड हल्ला करणे योग्य नसून याची सरकारने आणि गृह खाते सांभाळणारे व राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन अशा वृत्तीच्या हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी प्रकाश तळवणेकर यांनी काढलेल्या पत्रकातून केली आहे .
आज गोव्यासारख्या लहानशा शांतताप्रिय राज्यात पत्रकारावर आणि तेही संपादकावर अशा पद्धतीने हल्ला आणि अर्वाचे भाषा वापरणे योग्य नसून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची गरज आहे .आज आमचा गोवा कुठल्या वाटेने मार्गक्रमण करत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आता पत्रकारांनाही येत आहे . मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यात विशेष लक्ष घालून या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर दृष्ट्या कारवाई करण्याचे आदेश गृह खात्याला द्यावे अशी मागणी पेडणे पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रकाश तळवणेकर यांनी केली आहे.
प्रकाश तळवणेकर यांनी पुढे म्हटले आहे की या राज्यात जर पत्रकारावर असे हल्ले व्हायला लागले तर इतरांनी कोणता बोध घ्यावा असा प्रश्न उपस्थित करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आज झालेला हा आघात असून या प्रकाराला भविष्यात थारा सरकारने आणि सरकारी यंत्रणेने देऊ नये असे प्रकार गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्यात यापुढे कधी होऊ नये यासाठी ठोस पावले उचलून योग्य तो न्याय ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक सागर जावडेकर यांना द्यावा अशी मागणी काढलेल्या पत्रकातून केली आहे.










