अपंगत्व हे मुलांमधील विशेषत्वाला जाणीव करून देणारे लक्षण: तुळशिदास गावस
अपंगत्व हे मुलांमधील विशेषत्वाला जाणीव करून देणारे लक्षण: तुळशिदास गावस , कृणाल ठाकूर ठरला पेडणे तालुक्यातील पहिला दिव्यांग बी.ए एल.एल.बी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी, नवचेतना युवक संघातर्फे गौरव
पेडणे (प्रतिनिधी)
अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे, त्या मुलांमधील विशेषत्वाची जाणीव करून देण्यासाठी दिलेले एक लक्षण असते म्हणूनच कुणी हात नसूनही आपल्या पायाने चित्रे काढतो, तर कुणी आपल्या पायानेच शिल्पाकृती तयार करताना दिसतो. अर्थात यातून त्यांनी आपल्या अपंगत्वावर मातच केलेली दिसते, मात्र यासाठी पालकांनी सक्षम असणे गरजेचे असते. कृणाल ठाकूर यांनीही आपल्या अपंगत्वावर मात करत बी.ए, एल.एल.बी ही पदवी संपादन करून आम्हा समस्त पेडणेवासियांना अभिमान वाटणारे कार्य केलेले आहे. जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपल्याला ध्येयाकडे पोहोचण्यास कोणीही अडवू शकत नाही हे कृणालने आपल्या कृतीतून दाखवून दिले, असे प्रतिपादन समाजसेवक तथा चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस यांनी केले.
नवचेतना युवक संघ पेडणे यांनी आयोजित केलेल्या पेडणे तालुक्यातील पहिला बी.ए एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण करून कायद्याची पदवी संपादन करणारा देऊळवाडा हरमल पेडणे येथील कृणाल किरण ठाकूर यांच्या गौरव प्रसंगी तुळशीदास गावस बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, वडिल किरण ठाकूर, आई करिश्मा ठाकूर उपस्थित होते.
नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर म्हणाले की, माणसाकडे जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल, तर जीवनात अशक्य असे काहीच नाही. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागते. यानंतर यश खेचून आणता येते. कृणाल ठाकूर यांनी असेच अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे. अपंगत्वावर मात करत परिस्थितीला दोषी न ठरवता स्वतः परिस्थिती बदलवून संपादन केलेले हे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.अपंगत्व येताच अनेकजण हतबल होऊन एकतर जगायची आशा तरी सोडून देतात किंवा रडत-कुढत तरी आयुष्य जगतात; पण याला कृणाल ठाकूर हे व्यक्तिमत्व अपवाद ठरले आहे.
[] अपंगत्व कधीच ध्येयाच्या आड येत नाही: कृणाल ठाकूर
यावेळी मनोगत व्यक्त करताना कृणाल ठाकूर म्हणाला की, तुमचे ध्येय निश्चित असेल आणि त्यादृष्टीने तुम्ही सातत्य राखत मेहनत करत असाल तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक,शारीरिक अडचणींवर तुम्ही सहज मात करुन जाल.कठोर परिश्रमाला पर्याय नाही. मेहनतीची जोड असेल तर ध्येय कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते. आपल्याला प्राथमिक स्तरावर शिक्षक श्री. दाभोळकर, माध्यमिक स्तरावर ज्योती वळवईकर व धनश्री सुभाजी, उच्च माध्यमिक स्तरावर प्रा. राज देसाई तसेच हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वेळोवेळी आपल्याला प्रोत्साहन दिले त्यामुळे आज मी हे यश संपादन करू शकलो. माझ्यासाठी आई-वडिलांनी जी मेहनत घेतली तसेच वडिलांनी आपल्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपल्याला पणजी येथे कॉलेजमध्ये ने आण करायचे काम केले. नवचेतना युवक संघाचे कार्य हे विविध क्षेत्रात खूप जोमाने चालू आहे. आपला गौरव करून या संस्थेने कौतुकाची थाप आपल्या पाठीवर दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
[] आपण दिव्यांगासाठी काम करणार: कृणाल ठाकूर
पुढे बोलताना कृणाल ठाकूर म्हणाले की, पेडणे तालुक्यात ४५० दिव्यांग व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींच्या ज्या काही समस्या सरकार दरबारी किंवा अन्य ठिकाणी असतील त्यासाठी आपण नेहमीच त्यांना सहकार्य करणार. सरकारी कार्यालयातील अर्ज करणे, योजना संदर्भात पत्रव्यवहार यासारखी कामे करून माझ्या कायद्याच्या पदवीचा मी पूर्ण वापर समाजाच्या सर्व घटकांना करणार असल्याचे मत कृणाल ठाकूर यांनी व्यक्त केले.
फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कृणाल ठाकूर हे जरी अपंग असले तर त्याने बी.ए एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेऊन दिव्यांग मुलांना तसेच इतर सर्व सामान्य वर्गातील मुलांना एक आदर्श घालून दिला आहे. दिव्यांगावर मात करून त्यांनी ही पदवी संपादन केली ही बाब अभिमानास्पद आहे. पणजी सारख्या शहरात जाऊन बी.ए एल.एल.बी ही पदवी संपादन करणे ही साधी बाब नाही मात्र त्याचे आई-वडील यांनी अथक परिश्रम घेऊन कृणालला ही पदवी संपादन करण्यासाठी जी मेहनत आणि कष्ट घेतले त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे तसेच इतर दिव्यांगांच्या ज्या विविध समस्या असतील त्या सरकार दरबारी त्यांनी आपल्या वकिलीच्या शिक्षणाद्वारे मांडाव्यात अशी आशा व्यक्त करत त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
फोटो: पेडणे: कृणाल ठाकूर यांचा गौरव करताना सरपंच तुळशीदास गावस सोबत नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, किरण ठाकूर.










