वीज खाते व सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ते विभाग) यांच्या विरोधात कोर्टात जाणार : हनुमंत नाईक

👇Click and Listen

वीज खाते व सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ते विभाग) यांच्या विरोधात कोर्टात जाणार : हनुमंत नाईक

आसगाव पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार धरून वीज खाते व सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ते विभाग) यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती आसगाव पंचायतीचे सरपंच हनुमंत नाईक यांनी पंचायतीच्या झालेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत दिली. आज दिनांक 28 रोजी झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती फार कमी होती.

येथील रस्त्याच्या दुर्दशेस कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांना कळ्या यादीत टाकावे असे कोर्टाच्या अर्जात नमूद करावे असेही काही ग्रामस्थांनी सुचवले. या ग्रामसभेत आसगाव पंचायतीचा 2024-25 सालाकरिता अडीच कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या ग्रामसभेत 39A या जमीन रूपांतरण कायदा संदर्भात चर्चा करण्यात आली परंतु हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर जास्त चर्चा करता येणार नसल्याचे सरपंचांनी सांगितले.

लोकांना सरकारी कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावी व सरकारी इतर माहिती मिळावी याकरिता पंचायत गृहाशेजारी बांधण्यात आलेले माहिती घर बरीच वर्षे विना वापर पडून आहे. हे माहिती घर पुन्हा चालू करणे शक्य होत नसेल तर संबंधित मंत्र्याचा सल्ला घेऊन किंवा त्यांची परवानगी घेऊन ही जागा आसगाव जैवविविधता व्यवस्थापन समितीला वापरण्याकरता देण्यात यावी अशी सूचना जैवविविधता समितीच्या सदस्यांनी यावेळी ग्रामसभेत केली.

दरम्यान नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर व इतरत्र पाणी साचून राहिले, या पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्याकरिता पंचायतीने गटारे, नाले यांची सफाई करावी व इतर पाणी वाहून जाण्याच्या वाटा साफ कराव्यात जेणेकरून पाणी साचून राहणार नाही अशी सूचना ग्रामस्थांनी यावेळी केली.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment