पार्से गावकऱ्यांचा पिनकोड बदलाला तीव्र विरोध, पार्से कृती समितीची स्थापना
पार्से: पार्से गावाचा पिनकोड ४०३५१२ (पेडणे) ऐवजी ४०३५१७ (सिओलीम, बार्देश) करण्याच्या प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पार्से ग्रामपंचायतीच्या वतीने HIM हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत पार्से कृती समिती स्थापन करण्यात आली असून देवेंद्र प्रभुदेसाई यांची अध्यक्षपदी निवड झाली. गावकऱ्यांनी हा निर्णय त्वरित मागे घेतला जावा अशी मागणी केली. अन्यथा पणजी मुख्य टपाल कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यावेळी पार्से सरपंच अजय कलंगुटकर, ग्रामपंचायत सदस्य आणि कृती समिती अध्यक्ष देवेंद्र प्रभुदेसाई यांनी आपली मते मांडली. तसेच माजी पंच गुरुदास पेडणेकर यांनीही गावकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.
गावकऱ्यांनी हा पिनकोड बदल तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून योग्य तो निर्णय होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला.










