अमेरिकेतून भारतीय नागरिकांची अमानुषपणे हकालपट्टी : वीरेंद्र शिरोडकर
पणजी : अमेरिकेतून भारतीय नागरिकांची अमानुषपणे हकालपट्टी केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. भारतीयांना बेड्या घालून परत पाठवले जात आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार गप्प का आहे? आपल्या नागरिकांसाठी आवाज उठवण्यास ते अपयशी ठरत आहेत.
या निष्क्रीयतेच्या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या (GPCC) मुख्यालयात काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उत्तर गोवा प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, आमदार अॅड. कार्लोस अल्वारेस फेरेरा, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश नादर आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान नेत्यांनी स्पष्ट केले की, भारताला असे सरकार हवे आहे जे आपल्या नागरिकांचे रक्षण करेल, त्यांना अशा प्रकारे परदेशात अपमानास्पद परिस्थितीत सोडून देणार नाही. भाजप सरकारने त्वरित पावले उचलून या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी आणि परदेशातील भारतीय नागरिकांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रसंगी काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली की, अन्यायग्रस्त प्रत्येक भारतीयाच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, मग तो देशांतर्गत असो किंवा परदेशात.










