“घोळ” या रानभाजीचे औषधी महत्त्व व पाककृती
औषधी गुणधर्म:
घोळ मूळव्याधिवर गुणकारी औषध आहे. भाजी शीतल, द्रवपदार्थ शोषून घेणारी, सूज कमी करणारी आणि रक्तशुद्धीसाठी उपयुक्त आहे. बिया स्नेहन (स्निग्ध पदार्थ) आणि मूत्र निर्माण करणाऱ्या आहेत. ठेच, मार, सुज व दाह असल्यास घोळ वाटून बांधतात. अलीकडील संशोधनात घोळीच्या पानात ओमेगा-३, फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याचे आढळले आहे, जे हृदय विकार दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. भाजीच्या सेवनाने शरीरात वाढलेला कफ, पित्तदोष कमी होऊन आतड्यांची हालचाल वाढून पोट साफ होते व त्यामुळे अपचन, गॅसेस व मूळव्याध बरा होतो. लघवी करताना जळजळ, जंतूसंसर्ग, उन्हाळे लागणे, हातापायांची, डोळ्यांची होणारी जळजळ या भाजीच्या सेवनाने कमी होते. भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असते. काही प्रकारच्या दम्यात, हृदय विकारातील खोकल्यात व धाप लागणे यामध्ये याच्या भाजीचा चांगला उपयोग होतो. डोळ्यांच्या विकारालाही या भाजीचा उपयोग होतो. या वनस्पतीवर केलेल्या संशोधनातून यामध्ये कॅल्शीयम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम इत्यादी खनिजे व जीवनसत्व अ, थायमीन, रायबोफ्लेवीन, निऑसिन, सारखी जीवनसत्वे आढळलीत.
पाककृती :
घोळीची पातळ भाजी :
साहित्य : घोळीची पाने व कोवळ्या तुऱ्या, लसूण, कांदा, गरम मसाला, खोबरे.
कृती: पाने व कोवळ्या तुऱ्या स्वच्छ धुऊन पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत गळत ठेवणे. भाजीतील पाणी पूर्ण गळून गेले की भाजी बारीक चिरून घेणे. लसूण पाकळ्या फोडणीकरीता ठेचून घेणे. कांदा बारीक चिरून तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेल्या लसूण पाकळ्यांची फोडणी द्यावी. लसूण पाकळ्या पिवळसर झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतवून घेणे. कांदा पिवळसर झाला की त्यात चिरलेली भाजी, हळदपूड, मीठ, भाजका गरम मसाला व ओले किसलेले खोबरे घालून चांगले परतवून घ्यावे. किचिंत पाण्याचा शिडकावा करावा व भाजी शिजवून अळूसारखी पातळ करावी व खाण्यास घ्यावी.










