शापोरा किल्ल्यावर जाण्याकरिता बांधण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण.

👇Click and Listen

शापोरा किल्ल्यावर जाण्याकरिता बांधण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण.

गोव्यात अनेक पुरातत्व वास्तू आहेत त्यापैकीच एक म्हणजे हा शापोरा किल्ला. या किल्ल्याला इतिहास आहे, ऐतिहासिक वास्तू म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. शिलाहार, कदंबा, पोर्तुगीज यांनी या गोव्यावर राज्य केले. केव्हापासून असलेल्या पुरातन वास्तू पाहायला त्याचा अभ्यास करायला अनेक पर्यटक येत असतात. या वास्तूंचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्याची गरज असून या खात्याकडून तसा प्रयत्न केला जात आहे असे प्रतिपादन पुरातत्व तथा समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

शापोरा किल्ल्यावर जाण्याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 5.77 करोड खर्च करून बांधण्यात आलेल्या पायऱ्यांचे व करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिओलीच्या आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो, पुरातत्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक निलेश फळदेसाई, हणजूण कायसुव पंचायतीचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, शितल नाईक, प्रतिमा गोवेकर, हणजूण कोम्युनिदादचे अध्यक्ष डॉमिनिक, ॲटर्नी सेबी, साबांखां चे अभियंता संदीप कारखानिस, माजी पंच सदस्य शितल दाभोळकर, माजी सरपंच सुहासिनी गोवेकर उपस्थित होते.

या किल्ल्याचे सर्वेक्षण करण्याकरता आपण दीड वर्षांपूर्वी आलो होतो त्यावेळी किल्ल्यावर येण्याच्या वाटेवर अनेक अनधिकृत व बेकायदेशीर प्लास्टिकची छते घातलेली बांधकामे करण्यात आली होती, हे सर्व अनधिकृत बांधकामे आपण अवघ्या दोन तासात हटवण्यास सांगितली. येथील स्थानिकांना आपला पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी येथे योग्य जागा उपलब्ध करून दिली जाईल परंतु त्यांनी ती बिगर गोमंतकीयांना भाड्याने देता कामा नये. या वास्तूचे जतन सानिकांनीच करायला हवे ते बिगरगोमंतकीय किंवा पर्यटक करणार नाहीत असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले. या किल्ल्यावर अगोदर सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात येत होते परंतु आता किल्ल्यावर जाण्यासाठी योग्य रस्ता करण्यात आल्यामुळे पर्यटकांचा ओघ आणखी वाढला असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

या किल्ल्याचे संवर्धन आणि सौंदर्यकरण करण्याची गरज होती याकरिता आपण पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत होते, येथील रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता तसेच वाहन तळाकरिता हणजूण कोम्युनिदादने जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य केले याबद्दल त्यांचे धन्यवाद करावे तितके कमीच. 2017 पासून या कामाची सुरुवात करण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी सर्व काम संपले परंतु लागलेल्या आचारसंहितेमुळे उद्घाटनाचे काम रेंगाळले असे सांगून येथील स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने योग्य जागा (स्टॉल्स) उपलब्ध करून द्यावेत असे शिओलीच्या आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी पुरातत्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत संचालक निलेश फळदेसाई यांनी केले तर पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment