सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये वन महोत्सव निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम.
निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळेच गेल्या मे महिन्यात तापमानात बरीच वाढ झाली होती, झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी होत असल्यामुळे तसेच जंगले नष्ट होत असल्याने निसर्गाचे संतुलन बिघडत आहे, असेच जर राहिले तर येत्या काही वर्षात तापमानात बरीच वाढ होईल आणि जगणे मुश्किल होईल याकरिता आतापासूनच सर्वांनी वृक्षारोपणासारखा उपक्रम राबवला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाला निदान एक तरी झाड लावावे आणि त्या झाडाचे संगोपन करावे असे आवाहन हणजूण कायसुव जैवविविधता समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी केले.
हणजूण येथील सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये वन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हणजूण कायसुव पंचायतीच्या उपसरपंच अग्नेस कार्वालो, पंच सदस्य सुदेश पार्सेकर, दिनेश पाटील, सुरेंद्र गोवेकर, मुख्याध्यापक फादर सिल्वेस्टर डिसोझा, व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
विकास कामे ही व्हायलाच हवीत परंतु त्यासाठी मोठमोठ्या झाडांचे बलिदान देता कामा नये, मोठी झाडे कापली की त्या ठिकाणी नुसती फुलझाडे किंवा शोभेची झाडे न लावता निसर्गाचे संतुलन राखणारी मोठ्या झाडांची रोपटी लावण्यात यावी असे नाईक यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी शक्य होईल तसे वृक्षारोपण करावे असे सांगितले. मुख्याध्यापक फादर सिल्वेस्टर डिसोझा यांनीही वनमहोत्सवाचे महत्व सांगितले. सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षसंवहाराचे परिणाम व वनमहोत्सवाचे महत्व नृत्य नाटिकेतून दाखवून दिले. यावेळी शाळेने घेतलेल्या वनमोहोत्सवाशी निगडित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
फोटो… हणजूण येथील सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये वन महोत्सव निमित्त वृक्षारोपण करताना हणजूण कायसुव जैवविविधता समितीचे अध्यक्ष रमेश नाईक सोबत मुख्याध्यापक फा. सिल्वेस्टर डिसोझा, उपसरपंच आग्नेस कार्वालो, पंच सदस्य दिनेश पाटील, सुदेश पार्सेकर, सुरेंद्र गोवेकर व इतर










