शहीद सैनिक रामचंद्र शिंदे यांना मानवंदना
पार्से, वार्ताहर : अखिल गोवा माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन व म्हापसा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद सैनिक रामचंद्र शिंदे यांच्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कुचेली वडेश्वर नगर येथे म्हापसा पालिका नगराध्यक्ष डॉक्टर नूतन बिचोलकर यांनी मानवंदना दिली.
कुचेली येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष नूतन बीचोलकर तसेच नगरसेवक सुशांत हरमलकर, माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ उपस्थित होत्या. यावेळी बोलताना बिचोलकर यांनी सांगितले की देशासाठी शिंदे यांनी हुतात्मे पत्करले. त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आजरामर होईल. इतिहास त्यांच्या बलिदानाची दखल घेईल.
यावेळी शहीद रामचंद्र शिंदे यांच्या वीर माता तारामती शिंदे यांना डॉक्टर नूतन बीचोलकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता शिरोडकर, माजी सैनिक अनिल बर्डे, इतर माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला जनता हायस्कूलच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी व डॉक्टर नुतन बिचोलकर यांनी मानवंदना दिली. या प्रसंगी दत्ता शिरोडकर यांनी स्वर्गीय शहीद शिंदे हा आपला माजी विद्यार्थी असल्याचे सांगून आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र अमोंणकर यांनी सूत्रसंचालन केले व अनिल बर्डे यांनी आभार मानले.
फोटो: वीर माता तारामती शिंदे यांना मानपत्र देताना नगराध्यक्षा डॉ. नुतन बिचोलकर. सोबत इतर मान्यवर. .










