माजी आमदार लव्हू मामलेदार यांचे निधन : किरकोळ वादातून मोठी दुर्घटन
बेळगाव: गोव्याचे माजी आमदार आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे लव्हू मामलेदार यांचे आज बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लव्हू मामलेदार खडे बाजार, बेळगाव येथे खरेदीसाठी गेले असता त्यांच्या गाडीची रिक्षासोबत किरकोळ धडक झाली. या घटनेवरून वाद वाढला आणि बाचाबाचीचे रूपांतर झटापटीत झाले. या झटापटीत लव्हू मामलेदार यांना उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लव्हू मामलेदार हे गोव्यातील धडाडीचे नेते आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांच्या अकाली निधनामुळे गोव्याच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
ही घटना एक धडा देणारी असून, किरकोळ वादाचे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. क्षुल्लक कारणांवरून निर्माण होणाऱ्या वादांवर प्रत्येकाने नियंत्रण ठेवावे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.










