मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याच्या उभारणीचा शुभारंभ
मालवण : मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणीचा पायाभरणी सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याची उंची जमिनीपासून तब्बल ९३ फूट असेल आणि तो कांस्य धातूपासून मजबूत व देखण्या स्वरूपात साकारला जाणार आहे.
शिवजयंतीच्या ऐतिहासिक दिवशी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या भव्यदिव्य पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक महत्वपूर्ण आकर्षण ठरणार आहे. कोकणच्या भूमीत उभा राहत असलेल्या या ऐतिहासिक स्मारकामुळे भविष्यात मालवण किल्ले राजकोटचा लौकिक अधिक वाढणार आहे.










