*व्हायकाऊंट ऑफ पेडणे प्रायमरी स्कूलने साजरी केली एकादशी*
गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेतून पंढरीची वारी आणि विठोबा राया याचे अतूट नाते आहे. गोमंतकीय भजन कला व कीर्तन प्रेम हे सर्वांनाच परिचित आहे. प्रत्येक भागात असलेली विविध मंदिरे गोव्याच्या भावभक्तीची श्रद्धास्थाने आहेत. या अशा उज्वल परंपरा लाभलेल्या प्रदेशात आषाढी एकादशी उत्सव सुद्धा अगदी उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाचा एक भाग म्हणून व्हायकाऊंट ऑफ पेडणे प्राथमिक स्कूल यांनी आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने साजरी केली. एकूण ५० विद्यार्थी वारकरी होऊन, त्या वारकरी समवेत विठ्ठल – रखुमाई, विविध संत मंडळी पेहरावात आली होती. प्राथमिक स्कूलच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात अभंग, प्रवचन, किर्तन, ओव्या अशी विविध भक्तीची गाथा गायली. संत तुकारामाची पालखी आणि त्या समवेत संत तुकाराम या वारी समवेत विठ्ठल दर्शनाला चालले आहेत असा सुंदर मिलाप सादर केलेल्या दिंडीत होता. सांस्कृतिक मूल्य ही फार महत्त्वाची असतात आणि असे विविध उपक्रम राबवून ती मुलांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य शाळा करते असे प्रतिपादन यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदेश धारगळकर यांनी काढले. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाला पालक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे यांनी मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. साक्षात विठ्ठल रखुमाई चे दर्शन या निमित्त पहावयास आले. विविध उपक्रम राबवण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्राथमिक विभाग प्रमुख राजमोहन शेटये यांनी शेकडो वर्षा पूर्वीच्या या परंपरेची ओळख मुलांमध्ये व्हावी आणि ते संस्कार रुजून ही परंपरा आणि भक्ती चिरंतन टिकावी या हेतूने सदर उपक्रमाला चालना दिली असे नमूद केले. सदर कार्यक्रमाच्या संयोजिका शिक्षिका पूजा नाईक या होत्या. मुलांच्या या दिंडीने शाळेचा परिसर टाळ मृदंग आणि गजराने दुमदुमून गेला होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका विस्मिता शेटये हिने केले व आभार पूजा नाईक हिने मानले.










