गोव्याचे क्रीडापटू करणार भारताचे प्रतिनिधित्व
– युरोपमध्ये नोव्हेंबर१८ रोजीपासून जागतिक किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा
म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) :
म्हापसा येथील ‘कोंबाट कराटे बॉक्सिंग मार्शल आर्ट अकादमी’ (‘सीकेबी’ अकादमी’)शी संलग्तित असलेले आठ क्रीडापटू तसेच एक महिला प्रशिक्षक व एक रेफ्री यांचा समावेश असलेला संघ स्पेन-युरोपमध्ये ॲलिकान्टे येथे १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठाप्राप्त अशा जागतिक किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सध्या हे विद्यार्थी मुख्य प्रशिक्षक तथा जागतिक किकबॉक्सिंग फेडरेशन रेफ्री हुसेन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन सराव करीत आहेत. येत्या काही दिवसांत हा संघ युरोपला रवाना होणार आहे.
या संघातील सदस्य पुढीलप्रमाणे: महिला क्रीडापटू : अहद मुल्ला (ज्युनिअर्स), सांची चव्हाण (ज्युनिअर्स), पुरुष क्रीडापटू : इथन सेबॅस्टियन (स्पेशल चाइल्ड : ऑटिजम; सब-ज्युनिअर्स), दानिश मुल्ला (ज्युनिअर्स), अदयान खान (ज्युनिअर्स), अकीफ सय्यद (ज्युनिअर्स), मसूद कटवालिया (सिनिअर्स), सागर नाईक (सिनिअर्स); महिला संघ प्रशिक्षक : मानसी सेबॅस्टियन; जागतिक किकबॉक्सिंग फेडरेशन रेफ्री : हुसेन मुल्ला.
यासंदर्भात बोलताना ‘गोवा स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन’च्या माध्यम व प्रसिद्धी सल्लागार श्रेया नाईक म्हणाल्या, ही स्पर्धा किकबॉक्सिंग या क्रीडाप्रकारातील सर्वाधिक मोठी जागतिक स्पर्धा असल्याचे मानले जाते व त्यात जगभरातील आघाडीच्या लढवय्यांचा समावेश असतो. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर ‘सीकेबी’ अकादमीचे हे प्रतिभावान विद्यार्थी जागतिक स्तरावर त्यांचे कौशल्य, त्यांची या क्रीडाप्रकाराच्या संदर्भातील बांधिलकी व खिलाडी वृत्तीचे प्रदर्शन करणार आहेत.
म्हापसा येथील ‘सीकेबी अकादमी’ ही ‘किकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया’शी संलग्नित असलेल्या ‘गोवा स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन’च्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. तसेच, ’किकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ हा महासंघ ‘जागतिक किकबॉक्सिंग फेडरेशन’शी संलग्नित आहे.
फोटो कॅप्शन :
म्हापसा : स्पेन-युरोपमध्ये ॲलिकान्टे येथे १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जागतिक किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेले क्रीडापटू ‘सीकेबी’ अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत.










