तुये पेट्रोल पंप जवळ चारचाकी आणि दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
पेडणे : तुये येथील पेट्रोल पंपाजवळ आर्टिका (GA 11 T 1672) आणि दुचाकी (GA 03 AK 6125) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार राज पेडणेकर (वय 25) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा घटनाक्रम
प्राप्त माहितीनुसार, आर्टिका चारचाकी वाहन पेट्रोल भरण्यासाठी वळत असताना हा अपघात घडला. मात्र, पेट्रोल पंप बंद असल्याने वाहन वळवताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वार राज पेडणेकर यांना अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत राज पेडणेकर जागीच ठार झाले.
मृत युवकाविषयी माहिती
मूळचे बिचोली येथील असलेले राज पेडणेकर तुये येथे मामाच्या घरी राहत होते आणि सध्या शिवोली येथे वास्तव्याला होते. काही काळ त्यांनी गॅरेज चालवण्याचे काम केले होते. त्यांच्या कुटुंबात आई व भाऊ आहेत, तर वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले. मृत्यूसमयी त्यांचा भाऊ बारावीच्या परीक्षेसाठी गेला होता.
पोलिस कारवाई
घटनेची माहिती मिळताच मांद्रे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास जबाबदार आर्टिका वाहनचालक सौरव गुडेकर (नेमळे, वेंगुर्ला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.











